आशिये ग्रामपंचायतच्यावतीने १३ जून रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
कणकवली, दि. १२ जून (प्रतिनिधी): नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांचा लाभ गावपातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आशिये ग्रामपंचायतच्यावतीने शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय, आशिये येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ आशिये गावातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सरपंच महेश गुरव यांनी केले आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत विविध आजारांची तपासणी करण्यात येणार असून रक्तदाब (बीपी), रक्तातील साखर (शुगर), रक्त तपासणी, ईसीजी, एक्स-रे, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल तसेच डोळ्यांची तपासणी यांसारख्या महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय पात्र लाभार्थ्यांसाठी एचपीव्ही लसीकरणाची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.
शिबिरादरम्यान हृदयरोग प्रतिबंध, एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व, महिलांचे आरोग्य तसेच विविध आजारांबाबत आरोग्य तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. डोळ्यांची तपासणी करून गरजू नागरिकांची चष्म्यासाठी नोंदणी करण्यात येणार असून आवश्यक असलेल्या रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी पुढील प्रक्रिया ग्रामपंचायतमार्फत राबविण्यात येणार आहे. तसेच कमी वजनाच्या बालकांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधाही या शिबिरात उपलब्ध राहणार आहे. लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे.
थायरॉईड, कोलेस्ट्रॉल व रक्तातील साखर तपासणी अचूक होण्यासाठी संबंधित नागरिकांनी सकाळी ९ वाजता उपाशीपोटी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपयुक्त उपक्रमाचा लाभ गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सरपंच महेश गुरव तसेच आशिये ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

